Ad will apear here
Next
पारंपरिक भात वाणांचे जतन आणि संवर्धन : सिंधुदुर्गातील प्रयोग


शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच. 
.......
संपूर्ण आशिया खंडात एक जुनी म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे ‘paddy and poverty goes together.’ याचा मराठी अर्थ असा, की शेती आणि दारिद्र्य हातात हात घालून चालतात. आणि जुन्या म्हणींचा अर्थ हा फार व्यापक असतो. त्यामुळे त्यांना खोटं पाडणं म्हणावं तितकं सोपं नसतं. 

आपण कोकणातली माणसं, आपलं मुख्य अन्न भात आहे, स्वाभाविकपणे आपला भर हा भातशेतीवर, त्यामुळे वरील म्हण आपल्या कोकणच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू आहे. यावर मात करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. आपण पारंपरिक बियाण्यांकडून संकरित बियाणी आणि पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक लागवड पद्धतीकडे वळलो; पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. हे जरी खरं असलं, तरी जगाने विशेषतः आपल्या भारत देशाने पुन्हा आपल्या पारंपरिक सिद्धांतांकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केल्याने या विषयात आशेचा किरण दिसू लागलेला आहे. 

माझ्या मते बाबा रामदेव हे याचं एक चांगलं उदाहरण. त्यांनी आसनाला मजबूत अर्थाची जोड दिली. शेती या विषयातसुद्धा नक्की असे काही तरी घडण्याची वेळ आलेली आहे आणि करोना संकट हे त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल. 

शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच. 



सचिन विजय चोरगे हा कुडाळ तालुक्यातील डिगस गावचा युवक. पहिलीचे अॅडमिशन ते एमएससी प्राणिशास्त्र या विषयातलं पदव्युत्तर शिक्षण मुंबईसारख्या शहरात झालेलं. काही काळ नोकरीसुद्धा मुंबईतच; पण मूळ गावी येऊन शेती या विषयात काही तरी करण्याची ओढ असल्याने गावी परतला. दोन-चार वर्षं प्राध्यापकी केली. मन रमेना म्हणून पुन्हा शेतीत संशोधन सुरू केलं. दरम्यान, त्याला लंडनच्या रफड संस्थेकडून फंडेड प्रोजेक्ट मिळाला. संशोधनाचा मूळ विषय होता शेतातील कीटक. पुढे जाऊन त्याने शेणकिड्यांवर काम केलं. असं करता करता लक्षात आलं, की ऑरगॅनिक शेती आणि खास करून त्यातल्या बियाण्याचं संवर्धन, इथली शेती आणि जंगलातली जैवविविधता यावर काम करणं गरजेचं आहे. योगायोगाने सचिन २०१८ साली पुणे येथील ‘बाएफ’ या संस्थेच्या संपर्कात आला. ही संस्था ‘महाराष्ट्र जीन बँक’ अर्थात ‘महाराष्ट्र जनुक कोष’ या प्रोजेक्टवर काम करत होती. सचिनच्या आवडीचाच विषय होता त्यामुळे ही संधी त्याच्या कोअर इंटरेस्टला पुढे नेण्यासाठी महत्त्वाची अशीच ठरली. 

त्याने मग पिकांची जैवविविधता, खास करून भात पीक यावर काम सुरू केले. आपल्या जिल्ह्यातील लाल भाताच्या अठरा आणि सफेद भाताच्या आठ अशा मिळून एकूण २६ पारंपरिक भात जातींवर अभ्यास केला. त्या त्या वाणाचा जीवशास्त्रीय अभ्यास, दोन वर्षांची प्रत्यक्ष लागवड या सर्वांचा अहवाल त्याने बाएफ संस्थेला सादर केला. बाएफ संस्था आता या भात जातींच्या अधिकृत नोंदणीसाठी प्रयत्नशील आहे. 

यादरम्यान ‘नाबार्ड’कडून जिल्ह्यातील लुपिन या संस्थेला शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) स्थापन करण्याचा प्रकल्प मिळाला. लुपिन संस्थेने ‘महाराष्ट्र जनुक कोष’ संशोधनासाठी सचिन आणि बाएफ संस्थेला सहयोग दिलेल्या कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन ‘अॅग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ या नावाने कंपनी तयार केली, ज्यात दहा प्रमोटर आणि ११० शेतकरी सभासद आहेत. 

या कंपनीने पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन, लागवड यावर काम करायचे असून, लुपिन संस्था याचे एक बिझनेस मॉडेल तयार करत आहे, त्याजोगे शेतकऱ्यांमध्ये या वाणाविषयीची जागृती, शुद्ध वाणाची निवड करण्यासाठीचे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन, त्याची उत्पन्न वाढ, पिकाचे ब्रँडिंग आणि विक्रीसाठीचे मार्केट डेव्हलप करता येईल. 

सचिन म्हणतो, आम्ही बियाणी गोळा करणे, वैज्ञानिकदृष्ट्या त्याचा अभ्यास करणे, शुद्ध बियाणी मिळवणे हे काम केलं. चांगलं उत्पादन देणाऱ्या जिल्ह्यातल्या प्रमुख अशा वालय, सोरटी, खारा मुनगा आणि घाटी पंकज या लाल जातीतल्या भाताचे वाण कमी होत चालले आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे संकरित शेतीकडचा लोकांचा कल. लोकांना संकरित शेतीत प्रतिगुंठा उत्पन्न जास्त दिसतं; पण गावठी आणि संकरित भाताच्या दराचा विचार केला तर प्रति गुंठा कमी उत्पन्नाची पारंपरिक भात लागवडच जास्त फायदा मिळवून देते. पारंपरिक वाणातून उत्पन्नवाढीसाठीसुद्धा जिल्ह्यात पूरक प्रयत्न सुरू आहेत. 

मागील वर्षी कुडाळ तालुक्यातील निवजे गावात कृषी खात्यामार्फत एक प्रयोग केला गेला. यात ‘घाटी पंकज’ या गावठी वाणाने शेतकऱ्यांना प्रति गुंठा तब्बल ८५ किलोचा उतारा दिला. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कांबळे साहेब आणि नीलेश उगवेकर यांनी फार मेहनत घेतली होती. अतिवृष्टीचा त्रास असूनही इतर ठिकाणी ‘वालय’सारख्या जमिनीला टेकलेल्या पिकानेही प्रति गुंठा ४० ते ४५ किलो उत्पादन दिले. याचाच अर्थ या पारंपरिक शुद्ध वाणाचे जतन, त्यापासून मिळणारे उत्पादन आणि त्याचा आजच्या मार्केट ट्रेंडनुसार मिळणारा दर हे गणित बेरजेचे आहे. 

उदाहरणच द्यायचे झाले, तर लाल भाताला ४० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळाले, तर सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटल दराप्रमाणे त्याचे ६८ हजार रुपये होतात. 
संकरित भाताचे सर्वसामान्य शेतातील उत्पन्न हेक्टरी ५० क्विंटल असते. बाजारभाव १२०० रुपये प्रति क्विंटल असा आहे. त्याप्रमाणे त्याची किंमत ६० हजार रुपये इतकी होते. (अजून पुढे जाऊन सांगायचं तर खरेदी-विक्री संघाने हे भात खरेदी केल्यास २४०० रुपये भाव मिळतो; पण त्यात मर्यादा आहेत.) हा झाला प्रत्यक्ष पैशातला नफा. त्याव्यतिरिक्त आरोग्य वगैरे बाबी आहेतच. 

बाएफ, नाबार्ड, लुपिन या माध्यमांतून हा विषय पुढे सरकत असताना ‘भगीरथ’च्या डॉ. प्रसाद देवधर यांनी हा पारंपरिक वाण जतनाचा विषय दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी जोडावा अशी सूचना केली. 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यानुसार कृषी विद्यापीठाचे संशोधक शेटे सरांशी या मंडळींनी भेट केली. जिल्हा बँक आणि सिंधुदुर्ग लाइव्ह यांच्या सहयोगाने फोंडा संशोधन केंद्रात झालेल्या चर्चासत्रात दापोली कृषी विद्यापीठसुद्धा याच्याशी पूरक कामात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता या कामाला अधिक गती मिळेल. 

मालवणीत सांगायचे झाले, तर ‘अशे सगळे बारा पाच ह्या विषयात एकठय झाले आनी गारान्याक उबे रवले, तर ‘गावठी वाणाच्या’ शेराक सव्वाशेर गावान, हातातल्या पाचाचे पन्नास होवक लय येळ लागाचो नाय’.... 

- प्रभाकर सावंत
संपर्क : ९४२२३ ७३८५५ 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZBCCN
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’ शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग
‘दरवळ’ सोनचाफ्याच्या कलमांचा स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करणाऱ्या, अस्सल कोकणच्या लाल मातीतल्या सुगंधवेड्या ‘उदय गोपीनाथ वेलणकर’ यांची ही यशोगाथा...
‘पथदर्शी’ त्या काळच्या मागास मानल्या जाणाऱ्या अनेक जाती-जमातीतील समाज धुरिणांनी स्वतः शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवलं, जगाचा अनुभव घेतला, आणि या सर्वांचं महत्त्व लक्षात आल्यावर आपल्या समाजातील लोकांना विद्या, मती, नीती, गती, वित्त अशा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याच संदर्भाने एका समाजातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language